जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली गावातील एका शेतकऱ्याने कर्जबाजाराला आणि शेतातील सततच्या नापीकीला कंटाळून विषारी औषध घेतल्याने त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रवींद्र कौतिक पाटील वय-५८, रा.भादले ता. जळगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रविंद्र पाटील हे पत्नी मुलगा आणि दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतातील सततची नापीकी आणि सोसायटीचे कर्ज घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी शेतात असताना पिकावर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी छायाबाई, मुलगा खुशाल आणि दोन मुली असा परिवार आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात २२ डिसेंबर रोजी त्यांच्या मुलीचे लग्न होते, घरात आनंदाचे वातावरण असतांना त्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.