जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्याघरात मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. शिवाजी चिंधा पाटील (वय-५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवार १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्यात म्हटले आहे की, “कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे नमूद केले होते. शिवाय ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा गोपाळ आणि पत्नी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.