प्रताप महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) येथील वाणिज्य व व्यवस्थापन मंडळ, प्रतापीयन्स प्रेरणा प्रबोधिनी आणि स्व.प्रा. पी.एस.सैनानी सर यांच्या ८ व्या पुण्यतिथी निमित्त दिनांक २ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय कार्यशाळा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, उपप्राचार्य प्रा.एस.ओ.माळी व करसहाय्यक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस. ओ.माळी यांनी केले. एक दिवसीय कार्यशाळा एकूण ४ सत्रांमध्ये certificate Courses ला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली होती. पहिल्या सत्रात खा.शि.मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना “व्यक्तिमत्व विकास” या विषयावर महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आपल्या गुरूंचे स्मरण करणे हा देखील व्यक्तिमत्व विकासाचाच एक भाग आहे. तसेच वाणिज्य व व्यवस्थापन हा अभ्यासक्रमच मुळात व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचनाची सवय लावावी तसेच भाषेवर प्रभुत्व मिळवावे. अनेक उदाहरणातून सोप्या आणि सरळ भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले. दुसऱ्या सत्रात प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.ज्योती राणे यांनी विद्यार्थ्यांना “यशाची सूत्रे” या विषयावर मौल्यवान असे मार्गदर्शन केले. त्यांनी 7 Habits of Highly Effective People’ या पुस्तकाचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी केवळ यशस्वी न होता परिणामकारक व्हावे असा सल्ला दिला. प्रभावी होण्यासाठी परिस्थितीत बदल करण्यासाठी आपण स्वतःला बदलणे आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात हि त्याचा अंतिम उद्देश विचारात घेऊन केली गेली पाहिजे व आपण हाती घेतलेल्या कार्यांचा योग्य क्रम लावला पाहिजे अशा उपयुक्त आणि मौल्यवान माहितीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तिसऱ्या सत्रात खा.शि.मंडळाच्या विश्वस्त व अर्बन बँक अमळनेर कार्योपाध्यक्ष वसुंधरा लांडगे यांनी ” सूत्रसंचलनाचे विविध पैलू” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन करतांना कोणत्या गोष्टी कराव्यात व काय टाळावे, हे त्यांनी सांगितले जर काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी नियोजन आवश्यक असते, यावर त्यांनी भर देत नेपोलियन बोनापार्टचे उदाहरण सांगितले. प्रत्येक युद्ध युद्धभूमीवर लढायच्या आधी नियोजन पूर्वक त्याची अगोदर टेबल वर मांडणी केली जायची आणि त्या नंतर युद्धभूमीवर त्याचप्रमाणे सूत्र संचलन करायच्या आधी त्याचे पूर्व नियोजन केले पाहिजे. त्यानंतर त्यांच्या मधुर स्वरात एका छानश्या गाण्याने त्यांनी तिसऱ्या सत्राचा समारोप केला.

शेवटच्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी खा. शि. मंडळाचे विद्यमान संचालक डॉ. बी.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना “व्यक्तिमत्व व आरोग्य” या विषयवार उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चांगल्या व्यक्तिमत्वासाठी उत्तम आरोग्य असणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, व्यायाम (शारीरिक व मानसिक) करणे आवश्यक आहे, हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शारीरिक व्यायामासाठी पायी चालणे, सायकल चालवणे व मानसिक व्यायामासाठी ध्यान करणे, विपश्यना करणे आदी गोष्टी त्यांनी उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितल्या.
सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणारे विद्यार्थांचा प्रवीण शांताराम पाटील व दिनेश बापूराव पाटील या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी स्व. प्रा.व्ही.सी.घरटे सर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे व २६ जानेवारी २०१९ प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन स्वर्णदिप राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.शिरसाठ दादा, मयूर पाटील व मयूर माळी यांनी प्रयत्न केले.

Add Comment

Protected Content