सतनामी समाजाच्या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाला लावली आग

रायपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्तीसगडमधील बलोदाबाजार येथे सतनामी समाजाच्या आंदोलनादरम्यान सोमवारी मोठा गोंधळ झाला. ५ हजारांच्या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. यानंतर जमावाने दगडफेक सुरू केली. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करताना काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला आग लावली. यानंतर लोकांची पोलिस आणि कर्मचाऱ्यांशी झटापट झाली. प्राप्त माहितीनुसार, १५ मे रोजी रात्री उशिरा सतनामी समाजाचे धार्मिक स्थळ असलेल्या गिरोडपुरी धामपासून ५ किमी अंतरावरील मानाकोनी बस्ती येथील वाघिणीच्या गुहेत स्थापित धार्मिक चिन्ह जैतखामचे नुकसान झाले. जैतखाम पाडल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील दसरा मैदानावर अनेक दिवसांपासून समाजातील हजारो लोक निदर्शने करत होते.या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक करून तुरुंगात रवानगी केली. पकडलेले लोक खरे आरोपी नसून पोलिस गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप लोक करत आहेत. सोमवारी झालेल्या निदर्शनादरम्यान या मुद्द्यावरून लोक संतप्त झाले. यानंतर परिस्थिती चिघळली.

जैतखाम हा छत्तीसगडच्या बोलीभाषेतील शब्द आहे. जैत म्हणजे विजय आणि खाम म्हणजे स्तंभ होय. जैतखाम हे मुळात सतनामी पंथाच्या ध्वजाचे नाव आहे, जे त्यांच्या पंथाचे प्रतीक आहे.साधारणपणे, सतनाम समाजाचे लोक परिसरात किंवा गावात एखाद्या प्रमुख ठिकाणी व्यासपीठावर किंवा खांबावर पांढरा ध्वज फडकवतात. सर्वात मोठे जैतखाम छत्तीसगडमधील गिरोधपुरी येथे आहे. त्याची उंची ७७ मीटर आहे, ती कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे. जमावाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील शंभरवर वाहनांना आग लावली. शहरातील बाजार बंद झाले आहेत. येथे अघोषित संचारबंदीसारखी स्थिती आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी बैठक बोलावत सचिव, डीजीपींना अहवाल मागवला आहे.

Protected Content