जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । दोन वर्षं करिता हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगार हा सुप्रीम कॉलनीमध्ये तलवार घेऊन दहशत माजवीत असताना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आले आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२६) राहणार सुप्रीम कॉलनी असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनीत राहणारा दिनकर उर्फ पिण्या चव्हाण याला जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दोन वर्षांकरिता हद्दपारचे आदेश काढले होते. दरम्यान त्याने हद्दपारचे आदेशाचे उल्लंघन करत सुप्रीम कॉलनी परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीश गरजे, मंदार पाटील अशा पथकाने सुप्रीम कॉलनीत जाऊन कारवाई करत गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या चव्हाण याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळे २२ गुन्हे दाखल करण्यात आलेले असल्याचे समोर आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती श्रीमती जे एस केळकर यांनी कारागृहात परवानगी करण्याचे आदेश दिले आहे.