भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात कामावर येण्याच्या कारणावरून एकाने बांधकाम ठेकेदाराला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख जाफर शेख हसन (वय 50), रा. मुस्लिम कॉलनी, उस्मनिया मज्जित जवळ भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम ठेकेदाराचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार ४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शेख जाफर शेख हसन यांनी शेख अनिस शेख युनूस याला कामावर का येत नाही, असा जाब विचारला तसेच त्यावर कामावर यायची नसेल तर ऍडव्हान्स घेतलेले पैसे परत कर, असे बोलण्याचा राग आल्याने संशयित आरोपी शेख अनिस शेख युनूस याने बांधकाम ठेकेदार शेख जाफर शेख हसन यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जवळ असलेल्या एका धारदार वस्तूने वार करून कपाळावर व डोळ्यावर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदार शेख जाफर शेख हसन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख अनिस शेख युनूस यांच्या विरोधात बुधवार ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत तायडे करीत आहे.