जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी येथे चहा विक्रेत्याचे बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ६९ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी येथे सुनिल अरूण पाटील वय ३१ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चहाचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला.
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनिल पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.