धरणगावात बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरातील मातोश्री नगरात बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा संजय भदाने (वय-४८) रा. मातोश्री नगर, धरणगाव हे कुटुंबीयांसह राहतात. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २९ सप्टेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील ५ हजार रुपयांची रोकड आणि २ लाख ४६ हजार ३२० रुपयांचे दागिने असा एकूण २ लाख ५१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सुरेखा भदाणे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

 

Protected Content