जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथून काम आटोपून देव्हारी येथे दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवाशी रिक्षाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता. तर सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता चिचोली उमाळा फाट्याजवळील घडली होती.
या अपघात प्रकरणी अखेर शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल राजेंद्र सपकाळे वय 20 असे ठार झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील देव्हारी गावात विशाल राजेंद्र सपकाळे (वय-२०) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास विशाल सपकाळे हाताचा मित्र विशाल सुधाकर गुडवे (वय-२३) याच्यासोबत दुचाकी (एमएच १९ डीजी ५५१३) जळगाव येथून काम आटपून घरी देव्हारी येथे जाण्यासाठी निघाले होते.
चिचोंली ते उमाळा फाट्याजवळ मागून येणाऱ्या प्रवासी रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू १९४७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील विशाल राजेंद्र सपकाळे याचा मृत्यू झाला होता तर विशाल सुधाकर गुडवे हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमीस खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटनेनंतर अखेर शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षावरील चालक सलमान शेख हमीद रा. मेहरून जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी करीत आहे.