जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या तरुणाला भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. यामध्ये दुचाकीस्वार तरुण ठार झाला होता. याप्रकरणी मालवाहू वाहन चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हिराशिवा कॉलनीजवळील विठ्ठलवाडी परिसरात मयूर नरेंद्र पाटील हा तरुण वास्तव्यास होता. दि. १४ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तो मित्र जयेश दीपक पाटील याच्यासोबत दुचकाीने बेंडाळे चौकाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जात होता. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच २६, बीई ८४९०) क्रमांकाच्या मालवाहून वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी ही दुभाजकाजवळ असलेल्या इलेक्ट्रीक पोलवर आदळून दुचाकीस्वार मयूर पाटील याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मालवाहू वाहन चालक तेथून पसार झाला होता. याप्रकरणी मयताचे वडील नरेंद्र पाटील यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजराव हुडेकर हे करीत आहे.