पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पोलीस दलात पोलिस कर्मचारी असलेल्या पतीने घर व कार घेण्यासाठी पत्नीकडून पैसे मागत तीचा शारिरीक व मानसिक छळ केला. यामुळे पत्नीने १ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिस पतीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा संतोष सोनवणे (वय ३३, रा. जिजाऊनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचे पती संतोष सोनवणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे हा सध्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे.

अधिक माहिती अशी की, मृत सुरेखा यांच्या बहिण मनीषा अर्जुन भालेराव (रा. पालघर) व भाऊ जितेश शिरसाठ (रा. खर्दे, ता. शिरपुर) यांनी संतोष सोनवणे याच्यावर आरोप केले आहेत. संतोष सोनवणे हा गेल्या सहा महिन्यांपासून पत्नी सुरेखाचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. तीला कोणाशीही बोलु देत नसे. गेल्या महिनाभरापासून त्याने पत्नीचा मोबाईल देखील स्वत:जवळ ठेऊन घेतला होता. घर व कार घेण्यासाठी तो पैशांची मागणी करीत होता. याच कारणामुळे सुरेखा यांनी १ एप्रिल रोजी राहत्या घरात आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद जितेंद्र राजु शिरसाठ (वय ३८, रा. खर्दे, ता. शिरपुर) यांनी दिली आहे. त्यानुसार संतोष सोनवणे याच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कदीर तडवी तपास करीत आहेत.

 

Protected Content