ममता दीदी पंतप्रधानांवर भडकल्या

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदींनी केलेल्या खोचक टीकेवरून  ममता बॅनर्जी चांगल्याच भडकल्या. त्यांनी मोदींना थेट प्रत्युत्तर दिलं  “माझं मोदींना सांगणं आहे की त्यांनी आधी गृहमंत्र्यांना  सांभाळावं आणि नंतर आमच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा”

 

केंद्रीय निवडणूक आयोग गृहमंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे काम करत असल्याची टीका याआधी ममता बॅनर्जी यांनी केली होती.

 

 

पश्चिम बंगालमध्ये १ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आणि प्रचारसभांमधून होणारे आरोप-प्रत्यारोप अजून तीव्र झाले. अजून ६ टप्प्यांचं मतदान बाकी असून प्रचाराचा हा ज्वर अधिकच वाढत जाण्याची चिन्ह आहेत. दुसऱ्या टप्प्यात खुद्द ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात देखील मतदान झालं.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदीग्राममध्ये मतदान झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर खोचक टीका केली होती. उलुबेरियामधल्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले होते, “अशी अफवा पसरली आहे, की तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. कारण नंदीग्राममधल्या मतदारांनी ममता बॅनर्जींना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.”

 

नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला ममता बॅनर्जींनी शुक्रवारी दिनहातामध्ये झालेल्या प्रचारसभेत उत्तर दिलं आहे. “पंतप्रधानांनी आधी गृहमंत्र्यांना सांभाळावं आणि नंतर आम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही काही तुमच्या पक्षाची लोकं नाहीत की तुमच्या सांगण्यानुसार वागू. मी नंदीग्राममधून निवडणूक लढवली आहे आणि तिथून जिंकून येणार हे निश्चित”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

 

नंदीग्राम मतदारसंघ ममता बॅनर्जींसाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. २००७ मध्ये इथूनच ममता बॅनर्जींनी डाव्या पक्षांच्या जमीन अधिग्रहणाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून ममता बॅनर्जी पुन्हा लोकांमध्ये चर्चेत आल्या. पुढे सध्या ममता बॅनर्जींविरोधात भाजपाकडून नंदीग्राममघ्ये निवडणूक लढवत असलेले सुवेंदू अधिकारी तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होते. गेल्या वर्षीच डिसेंबर महिन्यात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

 

कोलकात्यामधील भोवानीपुरा हा आपला नेहमीचा आणि हक्काचा मतदारसंघ सोडून ममता बॅनर्जी यंदा नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यापाठोपाठ भाजपाने देखील सुवेंदू अधिकारी यांना ममता दीदींच्या विरोधात नंदीग्राममधूनच मैदानात उतरवल्यामुळे नंदीग्रामची निवडणूक बिग फाईट ठरली आहे.

Protected Content