चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद गावात प्रार्थना स्थळाजवळील रस्त्याच्या वादावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दगड, विटांचा वापर करण्यात आला. त्यानंतर दोषींवर कारवाई करावी यासाठी एका गटाचा जमाव महिला पुरुषांसह शेकडोच्या संख्येने पोलीस स्टेशनला आला. शेवटी जमाव पांगविण्यासाठी पोलीस अधीक्षक कमांडो पथकासह गावात दाखल झाल्यावर जमाव पांगविण्यात आला. आता गावात परिस्थिती नियंत्रणात आहे. सदर भागात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान यातील ८ ते १० जण जखमी झाले. त्यांचेवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यात ९३ आरोपितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यातील ४१ जणांवर अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी २१ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अडावद पोलीस स्टेशनच्या समोरील प्रार्थना स्थळाजवळील मदरशाच्या बांधकामावरून दोन गटात वाद निर्माण होऊन त्यांचे रूपांतर दगडफेक करीत दोन्ही गटाच्या ग्रामस्थांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने यात ८ ते १० जण जखमी झालेत. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी रवानगी करण्यात आली.
दरम्यान दोषींवर कारवाई करावी यासाठी एका गटाचा जमाव महिला पुरुषांसह शेकडोच्या संख्येने पोलीस स्टेशनला आला. यावेळी अपूर्ण पोलिस कुमकीसह सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांनी जमाव थोपवून ठेवत. चोपडा शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगांवहून महिला राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व स्पेशल कमांडो फोर्स दाखल झाल्यावर पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव डॉ. कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ याच्या पथकाने घटना घडलेल्या भागामध्ये जावून दंगेखोरांवर नियंत्रण मिळवले. रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक अडावद पोलीस ठाण्यात ठान मांडून होते. तर पहाटे चार वाजेपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव डॉ.कविता नेरकर या ठाण मांडून होत्या. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणून पहाटेपर्यंत दोन्ही कडील १४ अरोपिताना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधात एकुण ९३ जणांविरोधात दंगलीचा गुनहा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास उपवभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि सहाय्यक प्रमोद वाघ हे करीत आहेत.