मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चार व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. पैशाच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे. आरोपींनी आयफोन, मॅकबुक, चालक परवाना यांसारख्या वस्तू काढून घेतल्या. याप्रकरणी कुर्ला येथील विनोबा भावे मार्ग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जबरी चोरी, धमकावणे, अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार असद अन्वर हुसेन फारुकी हे शीव पूर्व येथील रहिवासी आहेत. त्यांचा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय आहे. रविवारी त्यांच्या कुर्ला कोहिनूर मॉलमधील कार्यालयात चार व्यक्ती शिरल्या. त्यात त्यांचा पूर्वीचा भागिदार इमाम याचाही सहभाग होता. त्यातील एकाने आपण गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगून तक्रारदाराला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने कार्यालयातील दोन संगणक घेतले आणि तक्रारदाराला गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेऊन जात असल्याचे सांगून मोटरगाडीत बसवले. त्यानंतर आरोपीने त्याला वाशी, सानपाडा बेलापूर याभागात गाडीतून फिरवले. तेथे तक्रारदाराला मारहाण करून त्याच्याकडील आयफोन, मॅकबुक, पॅनकार्ड, चालक परवाना अशा वस्तू काढून घेतल्या. याप्रकरणी व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी इमाम हा तक्रारदाराचा मित्र आहे. त्यांनी यापूर्वी व्यवसाय सुरू केला होता. पण तक्रारदार या व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर इमाम त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता. घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.