दुचाकीचा धक्का लागल्यावरून तरूणाला डोक्यात टाकली दगड व फरशी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भजे गल्लीतील सुयोग हॉटेलसमोर दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून अनोळखी चार-पाच जणांनी तरूणाला शिवीगाळ करत दगड व फरशीचे तुकडे डोक्यात टाकून जखमी केल्याची घटना रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी ८ जुलै रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, विक्की सुनिल सोनवणे वय २४ रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता तो नवीन बसस्थानकाजवळील भजे गल्लीतून दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीचा एका दुसऱ्या दुचाकीला कट लागला. या कारणावरून विक्की सोनवणे याला अनोळखी ५ जणांनी शिवीगाळ करत वाद घालून दगड व फरशीचे तुकडे डोक्यात टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या तरूणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी विक्की सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे अज्ञात ५ जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पल्लवी मोरे हे करीत आहे.

Protected Content