जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या अजिंठा चौकात दुर्दैवी अपघात घडला असून, एका रिक्षाने कट मारल्याने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश गोविंद चंदनकर (रा. शिव कॉलनी, जळगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, योगेश चंदनकर हे 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या (एमएच 19 सीवाय 4362) या दुचाकीने अजिंठा चौफुलीकडून छत्रपती संभाजीनगरकडे (पूर्वीचे औरंगाबाद) जात होते. अजिंठा चौफुलीवर (एमएच 19 सीडब्ल्यू 0471) क्रमांकाच्या एका रिक्षाने त्यांच्या दुचाकीला अचानक कट मारला. यामुळे योगेश चंदनकर दुचाकीवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र 4 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेसंदर्भात योगेश चंदनकर यांचा मुलगा कृष्णा योगेश चंदनकर याने गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ करत आहेत.



