Home Uncategorized एरंडोलच्या तरुणाची मोठी झेप; आकाश त्रिवेदी UPSC मध्ये देशात ७३ वा

एरंडोलच्या तरुणाची मोठी झेप; आकाश त्रिवेदी UPSC मध्ये देशात ७३ वा


एरंडोल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा (UPSC) परीक्षेत एरंडोल येथील युवक आकाश त्रिवेदी याने देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघ्या २३ व्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातही प्रेरणादायी संदेश पोहोचला आहे.

एरंडोल येथील ॲड. ओम त्रिवेदी आणि रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र असलेल्या आकाशने अत्यंत मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. आकाशने IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत बी.टेक. पदवी प्राप्त केली असून त्याची निवड देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथेही झाली होती. मात्र, देशसेवेची प्रेरणा मनात ठेवत त्याने नागरी सेवेकडे वाटचाल केली आणि पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले.

आकाशच्या शैक्षणिक प्रवासामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. आकाश आणि त्याचा लहान भाऊ अभय यांच्या शिक्षणासाठी पालकांनी नेहमीच मित्रवत वातावरण निर्माण केले. उत्तम शिक्षणासोबतच व्यापक वाचन, सामान्य ज्ञान आणि देश-विदेशातील घडामोडींबाबत जागरूकता वाढविण्यासाठी त्यांनी मुलांना सातत्याने प्रोत्साहन दिले. साधी राहणी आणि उच्च विचार यांचा संस्कारही त्यांनी मुलांमध्ये रुजवला.

आकाशचे वडील ॲड. ओम त्रिवेदी हे विधी सेवेत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असून भू-संपादन क्षेत्रात महाराष्ट्रभर त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. तर आई रेखा त्रिवेदी यांनी दक्षिणाम्नाय श्री शारदापीठम्, श्रृंगेरी (कर्नाटक) येथे आयोजित ‘गीता ज्ञान यज्ञ’ परीक्षेत श्रीमद्भगवद्गीतेचे १८ अध्याय कंठस्थ करून यश संपादन केले आहे. कुटुंबातील शैक्षणिक व संस्कारमय वातावरणामुळे आकाशला या यशापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळाली.

आकाशचा लहान भाऊ अभय सध्या राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर (NLU) येथे विधी शिक्षण घेत असून तोही शैक्षणिक क्षेत्रात आपला लौकिक निर्माण करत आहे. त्रिवेदी कुटुंबातील या दोन्ही भावंडांच्या यशामुळे एरंडोल शहरासह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनीही आकाशच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 


Protected Content

Play sound