मेहरूण तलाव चौपाटीवर होणार ५१ फूट उंच रावणाचे दहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |जळगावातील एल.के. फाउंडेशनतर्फे विजयादशमीनिमित्त बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५१ फूट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन मेहरूण तलाव चौपाटीवर करण्यात येणार आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. अशी माहिती माजी महापौर ललित कोल्हे यांनी दिली.

 

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतू कोराना जवळपास आटोक्यात आल्याने दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जळगाव शहरातील एल.के. फाऊंडेशनच्या वतीने मेहरूण चौपाटीवर तब्बल ५१ फुटाच्या रावणाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.  रावण दहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व हिंदुस्थानी भाऊ  यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर ललित कोल्हे, विरोधीपक्ष गटनेते सुनिल महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

मेहरूण तलावाचे खोलीकरण व चौफेर रस्त्यांचे रूंदीकरण झाल्याने यावेळी हा कार्यक्रम तलावातील चौथाऱ्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक व वाहनतळ व्यवस्थेसाठी सुविधा व तलावाच्या काठावर बॅरीकेटस लावण्यात आल्याची माहिती एल. के. फाउंडेशनकडून देण्यात आली आहे. विजयादशमीनिमित्त होणारे रावण दहन हे जळगावचे पारंपरिक आकर्षण आहे. दहनाच्या वेळी आकाशात रंगेबेरंगी व आकर्षक रोषणाई करणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी हा या कार्यक्रमातील जळगावकरांचा आकर्षणाचा विषय असतो.

 

Protected Content