रत्नागिरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रत्नागिरीतील मालगुंड मराठवाडी येथे धरणात पोहायला गेलेल्या अल्ववयीन पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ राजेंद्र राणे असे १७ वर्षीय मत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पार्थ हा गुरूवारी मालगुंड येथे आल्यानंतर तो आपल्या चार मित्रांसोबत सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी मालगुंड मराठवाडी येथील धरणात गेला. मात्र, पोहताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि पाण्यात बुडू लागला.
हा प्रकार त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी पार्थला पाण्यात बाहेर काढले आणि बेशुद्धावस्थेत त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. पार्थ हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका मुलगा असून इयत्ता बारावीत शिकत होता. पार्थच्या मृत्युने त्याच्या कुटुंबासह संपूर्ण मालगुंड गावावर शोककळा पसरली आहे. पार्थच्या पश्चात त्याचे आई-वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईक असा परिवार आहे.