धावत्या स्कूटीवर झाड पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धावत्या स्कुटीवर झाड पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. आई-वडिलांसमोरच मुलाच्या अंगावर झाड पडले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यश पंकज गुप्ता असं मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात ही घटना घडली. गुप्ता दाम्पत्य आपल्या १३ वर्षाच्या मुलासोबत श्रीनगर मुख्य रस्त्यावरून जात असताना अचानक मोठे झाड उन्मळून पडले. वडील दुचाकी चालवत होते तर आई मागे आणि मुलगा यश मधे बसला होता. झाड स्कूटीवर मध्यभागी बसलेल्या मुलाच्या पायावरच कोसळले. वडील समोर फेकले गेले तर आई देखील दुचाकी आणि झाडामध्ये अडकली होती.

मुलाच्या पायावर झाड पडल्याने तो वेदनेने किंचाळत होता. आई-वडिलांनी मुलाला काढण्यासाठी खुप प्रयत्न केले. मात्र त्यांना सहज ते शक्य झाले नाही. त्यानंतर काही नागरिकांनी धाव घेत कसेबसे झाड थोडे वर उचलून मुलाला बाहेर काढले. तोपर्यंत महापालिकेचे कर्मचारी देखील पोहोचले. कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला, पायाला आणि कंबरेला गंभीर इजा झाल्याने मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने नांदेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content