पाटणा : वृत्तसंस्था । लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. ”तुम्ही माझ्याकडून लिहून घेऊ शकता की नितीश कुमार १० नोव्हेंबरनंतर पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत.
माझी यात काहीच भूमिका नसेल, मला केवळ ”बिहार प्रथम, बिहारी प्रथम” एवढंच हवं आहे. मला हवं आहे की बिहारमधील चार लाख नागरिकांच्या सूचनेनुसार तयार केल्या गेलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार काम केले जावे.” असं चिराग पासवान म्हणाले आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.
चिराग पासवान यांनी आज मतदान केले व बिहारमधील जनतेला मतदानासाठी आवाहन केले. बिहार1stबिहारी1st आणि असंभव नितीश या हॅशटॅगचा वापर करत, त्यांनी ट्विट केले आहे. बिहारच्या समस्त जनतेला आवाहन आहे की, स्वतःवर गर्व करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावा. येणाऱ्या सरकारमध्ये बिहारमध्ये बदल झालेला दिसायला हवा. काही कामं झाली पाहिजेत.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नितीश कुमार भाजपाला धोका देतील आणि राजदसोबत जातील, असं विधान चिराग यांनी या अगोदर केलं होतं. याद्वारे त्यांनी बिहारच्या राजकारणाला एक नवा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला होता.
सन २०१५ मध्ये बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जदयूने लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत निवडणूक लढवली होती. यामध्ये राजद सर्वात मोठा पक्ष ठरला होता. दोघांच्या गठबंधनमुळे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले होते.
त्यानंतर काही काळानंतर नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावरील कथीत घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गठबंधनमधून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन केले होते. यापार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी हे विधान केलं आहे. चिराग यांनी सातत्याने नितीश कुमार यांच्यावर हल्ला केला आहे. जदयूमुळे एनडीएतून माघार घेत ते स्वतंत्रपणे निवडणूकही लढवत आहेत.