पाटणा : वृत्तसंस्था । बिहारच्या जनतेनं जंगलराज आणि युवराजांना नाकारलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील अररिया येथील फारबसगंजमध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आणि सुरूवातीची जी महिती मिळत आहे त्यावरून हे स्पष्ट होतंय की बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार बनेल. बिहारच्या पवित्र भूमिनं निश्चय केला आहे की यावेळी बिहारचा विकास करायचा आहे , असेही ते म्हणाले . .
“बिहारच्या जनतेला माहित आहे की कोण विकासासाठी काम करतंय. बिहारमध्ये परिवारवाद हरतोय आणि लोकशाही, विकासाचा विजय होत आहे. आज बिहारमध्ये अहंकार हरतोय आणि मेहनत जिंकतेय, बिहारमध्ये घोटाळ्याचा पराभव होत आणि लोकांचा हक्काचा विजय होत आहे, कायद्याचं राज्य आणणाऱ्यांचा विजय होत आहे. मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा या ठिकाणी निवडणुकीचा खेळखंडोबा झाला होता. त्यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ हिंसाचार, हत्या आणि बूथ कॅप्चरींग होतं. त्यावेळी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात होता आणि मतांची लूट केली जात होती,” असंही मोदी म्हणाले.
“बिहारमध्ये आज महिलावर्ग मोदींसोबत पुढे येण्यासाठी तयार आहे. बिहारमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती असती तर गरीब आईचा मुलगा आज पंतप्रधान झाला नसता. गेल्या दशकात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारनं विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. येणारं दशक हे बिहारच्या नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यचं आहे. गेल्या दशकात घराघरात वीज पोहोचली आणि आता २४ तास ते देण्याचं दशक आलं आहे,” असंही त्यांनी स्पश्ट केलं. आता पाईप गॅसद्वारे जोडणी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बिहारमध्ये आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता लोकांना विकासाचा लाभ मिळत आहे. सरकारकडून लोकांना सिलिंडर, शौचालय, आयुष्यमान भारतसारख्या योजनांद्वारे मदतही केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जे लोकं समाजात फुट पाडून सत्तेपर्यंत पोहोचू पाहत आहेत त्यांच्यापासू सावध राहण्याची आवश्यकता आहे. बिहारच्या लोकांना पक्क घर मिळत आहे. काही लोकांच्या घरांचं काम पूर्ण होऊन लवकरच ते त्यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.