जळगाव (प्रतिनिधी) रावेरमधून रक्षाताई खडसे यांचे एकमेव नाव दिल्लीला गेल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे मात्र,हरीभाऊ जावळे यांच्या उमेदवारीची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा सुरु आहे. याच पद्धतीने जळगाव लोकसभा मतदार संघात ए.टी. पाटील यांच्या जागेवर स्मिताताई वाघ,करण पवार आणि प्रकाश पाटील यांच्यापैकी एकाला तिकीट दिले जाईल,असे सांगितले जातेय. परंतु भाजप उमेदवार का बदलतेय? याची नेमकी कारणं त्यांना जनतेला सांगावीच लागतील. एवढेच नव्हे तर ती कारणं मतदारांना पटवून देखील द्यावी लागतील. अन्यथा विरोधकांच्या हातात आयते कोलीतच मिळेल आणि भाजपची मोठी गोची होईल.
जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदारांना डावलून ऐनवेळी नवीन उमेदवार दिले जातील, या चर्चेने सध्या संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्यापैकी असलेल्या रक्षाताई खडसे , ए.टी. पाटील या दोन्ही खासदारांचे तिकीट का कापले? याचे कारण सांगताना भाजपला नाकीनऊ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथराव खडसे यांना राजकीय शह देण्यासाठी ऐनवेळी हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी दिली जाईल,अशी चर्चा भाजपातीलच एक गट छातीठोक पद्धतीने करतोय. जर हरिभाऊ जावळे यांचे जाहीर झालेले तिकीट ऐनवेळी कापून रक्षाताईंना दिले जावू शकते. तर मग हरीभाऊ यांना ऐनवेळी का उमेदवारी मिळू शकत नाही? असे देखील या गटाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांना देखील उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा काही दिवसापासून जोर धरून आहे. काही कथित फोटोंवरून पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जातेय. परंतु हे फोटो खरे किंवा खोटे? याबाबत अजून काहीही सिद्ध झालेले नाही. एवढेच नव्हे तर, ए.टी.पाटील यांच्याविरुद्ध कोणत्याही महिलेने तक्रार दिलेली नाहीय. भाजपने उमेदवारी कापल्यास ए.टी.पाटील यांच्यावरील हे आरोप एकप्रकारे मान्य झाल्यासारखी स्थिती निर्माण होईल. त्यामुळे भाजपला निर्णय घेतांना सर्वांगीण विचार करावा लागणार आहे. कारण भाजप व संघाने केलेल्या सर्वेक्षणात ए.टी.पाटील यांना मतदारांची पसंती असल्याचे समोर आले आहे.
रावेरमधून रक्षाताई खडसे आणि जळगावमधून ए.टी.पाटील यांची उमेदवारी कापायची झाल्यास भाजपला मोठा ‘डॅमेज कंट्रोल’ची तयारी ठेवावी लागेल. रक्षाताई यांची उमेदवारी रद्द झाल्यास खडसे राज्याचे राजकारण बदलवून टाकतील. जे आजच्या घडीला भाजपला परवडणारे नाहीय. तर मराठा समाजातील व्यक्ती तिसऱ्यांदा निवडून मंत्री बनू नये,म्हणून खा.ए.टी.पाटील यांची उमेदवारी कापल्याचा प्रचार त्यांच्या समर्थकांकडून होऊ शकतो. एकंदरीत उमेदवार बदलतांना भाजप पक्षश्रेष्ठीला गहन विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. शेवटी उमेदवार बदलाचे सक्षम कारण सांगितल्या शिवाय नवीन उमेदवाराला जनतेसमोर कसं उभे करणार? त्यामुळे उमेदवार बदलाचा निर्णय घेतला तर, भाजपला मोठ्या अडचणींनचा सामना करावा लागू शकतो. विरोधकांना तर भाजला टार्गेट करायची आयतीच संधी मिळेल.
Only and only
Sh. a. t. nana patil
जळगांव लोकसभेतून शांतिगिरी महाराजांचे नाव खूप चर्चेत आहे ,पण जिल्ह्यातील पदाधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत ,तर भाजप केंद्रीय नेतृत्व त्याना शब्द सुद्धा दिलाय ,कारण महाराजांचा भक्त परिवारा प्रभाव महाराष्ट्रात किमान सात मतदार संघात आहे ,जर जळगाव लोकसभेतून जर भाजपने महाराजांना उमेदवारी दिली तर अप्रत्यक्ष पणे भाजपा ला याचा फायदा होणार हे त्यांना माहीत आहे