सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने माण, खटाव, फलटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये नदी-नाले आणि तलाव भरुन वाहू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मात्र, कालपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. परिणामी सातारा येथील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्रीपासून वीर, उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून नदीपात्रात मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
वीर धरणातुन रात्री 23,185 क्युसेक,उरमोडी धरणातुन रात्री 1900 क्युसेक तर कण्हेर धरणातील दोन वक्रदरवाजातुन रात्री 1750 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच म्हसवड भागात माण नदीला पूर आला आहे. याठिकाणी नदीने धोकादायक पातळी ओलांडली असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे म्हसवड-आटपाडी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर माण-खटाव तालुक्यातही मुसळधार पावसामुळे बंधारे भरुन वाहू लागले आहेत. येत्या काही तासांत सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.