रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने साडेतीन लाखांच्या दागिण्यांसह बॅग सुखरूप परत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकावर आव्हाणे येथील दाम्पत्यांची प्रवास करतांना साडे तीन लाखांचे दागिणे तसेच कपडे व इतर ऐवज असलेली २ बॅग नजर चुकीने स्थानकावर राहून गेल्या होत्या. सतर्क असलेल्या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी या बॅगचा शोध लावत ती परत प्रवाशांना मिळवून दिली आहे.

गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रवाशांच्या नातेवाईकाला ही बॅग सुपूर्द करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील सुनील पुंडलिक चौधरी व त्याची पत्नी नामे अंकिता सुनील चौधरी हे त्याच्या नातेवाईकांसह गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे नातेवाईकांसह जळगाव रेल्वे स्थानकावरुन पालघर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी जात होते. भुसावळ बांद्रा एक्सप्रेसने ते बसले व प्रवासाला मार्गस्थ झाले. यादरम्यान त्यांची १५ ग्रॅम मंगळसूत्र, १९ ग्रॅमची एक सोन्याची चैन असे साडेतीन लाखांचे दागिणे व कपडे तसेच इतर साहित्य असलेल्या दोन बॅग जळगाव रेल्वेस्थानकावर राहिली. रेल्वे गाडीत काही अंतर प्रवास केल्यानंतर सुनील चौधरी यांना बॅग रेल्वेस्थानकावर विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यांचे जळगाव शहरातील साडू ज्ञानेश्वर पाटील यांना माहिती दिली. ज्ञानेश्वर पाटील यांनी जळगाव रेल्वे स्टेशन गाठले व रेल्वे पोलीसांना घटना कथन केली.

त्यानुसार रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रामराव इंगळे व पोलीस शिपाई किशोर पाटील यांनी तत्काळ रेल्वे स्थानक परिसरात बॅगचा शोध घेत बॅग सुखरुप परत मिळवून दिल्या. तत्काळ दखल घेत दोन्ही बॅग सुखरुप परत मिळाल्याने ज्ञानेश्वर पाटील रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे. तसेच पोलिसांच्या तत्परतेचे कौतुकही केले आहे. पोलिसात जबाब नोंदवून घेत दोन्ही बॅग ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

Protected Content