बंगळूर । कुख्यात अशा इसीस या दहशतवादी संघटनेच्या पाच अतिरेकर्यांनी कर्नाटकात शिरकाव केला असल्याचा अलर्ट राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएतर्फे देण्यात आला आहे.
बंगळुरू येथील एम. एस. रामय्या रुग्णालयात कार्यरत तसेच बसवणगुडीतील रहिवासी डॉ. अब्दुर रहमान याला गेल्या महिन्यात एनआयएने अटक केली होती. त्याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. गुरुप्पनपाळ्या येथील सात युवक अचानक बेपत्ता झाले होते. हे युवक सौदी अरेबियाला गेले होते. तेथून ते इराण सीमेवरून सीरियामध्ये दाखल झाले होते. अमेरिकेच्या सैन्याचा सीरियामध्ये इसिसच्या दहशतवाद्यांबरोबर संघर्ष सुरू आहे. त्या लढ्यामध्ये उतरण्यासाठी ते सर्व युवक गेले होते अशी धक्कादायक माहिती या चौकशीतून समोर आली.
दरम्यान, यातील दोघांचा तेथे मृत्यू झाला. तर पाच जण कर्नाटकात परतले असून बंगळूरसह देशातील महत्त्वाच्या शहरांना धोका असल्याचा अलर्ट एनआयएने दिला आहे. या सातही जणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आले होते. इराक, सीरियासह काही देशांमध्ये अमेरिकेसह काहीजणांकडून मुस्लीम लोकांवर अन्याय केला जात आहे. त्यांच्याविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन युवकांना केले जात होते. सौदी अरेबियातील दहशतवादी इक्बाल जमीर हा त्यांना आर्थिक मदत करत होता. डॉ. अब्दुर रेहमान हा बंगळुरात इसिसची संघटना तयार करत होता. तो सिरियाला जाऊन परतला होता.
यानंतर डॉ. रहेमान याच्या मदतीने हे तरूण इसीसच्या संपर्कात आले होते. दरम्यान, आता हे दहशतवादी कर्नाटकात परतले असून ते काही तरी घातपात करू शकतात असा इशारा जारी करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.