कॅलिफोर्निया: वृत्तसंस्था । कोरोना विषाणूचा फैलाव दरवाजाचे हॅण्डल, बटणांच्या माध्यमातून फैलावत नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पृष्ठभागावरून विषाणूचा संसर्ग होईल हा मुद्दा आता मागे पडला आहे. सतत सॅनिटायझेशन होत असेल अशा जागांबद्दल भीती नसावी
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. संशोधनात सहभागी प्रा मोनिका गांधी यांनी म्हटले की, दरवाज्यासारख्या पृष्ठभागावरून संसर्ग फैलावणार नाही. एखाद्या व्यक्तीला संसर्गबाधित करतील एवढी क्षमता पृष्ठभागावर असलेल्या विषाणूमध्ये नाही, असे त्यांनी म्हटले.
संसर्ग रोखण्यासाठी हात धुणे आणि चेहऱ्याला हात न लावणे यासह सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर करणे हे प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. प्रा. मोनिका गांधी यांनी सांगितले की, जगभरातील अनेक ठिकाणी पृष्ठभागावर सातत्याने जीवाणू विरोधी औषधे, सॅनिटायझरचा मारा करण्यात येतो. आता या नव्या संशोधनामुळे ही बाब अनावश्यक होऊ शकते. संसर्ग टाळण्यासाठी दरवाजे, बटणे, लिफ्ट, जीने आदी ठिकाणी सातत्याने सॅनिटाइझ केली जातात.
प्रा. गांधी यांनी सांगितले की, विषाणूची बाधा पृष्ठभागावरील विषाणूमुळे होत नाही. या महासाथीच्या आजाराच्या सुरुवातीला पदार्थांद्वारेही संसर्ग फैलावत असल्याची भीती लोकांमध्ये होती. बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणे अथवा बाधित व्यक्तीला असलेल्या सर्दीमुळे बाधा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पृष्ठभागी विषाणू असल्यास त्याच्या संसर्गाचा धोका अतिशय कमी आहे. जगभरात जवळपास १० लाखांहून अधिक जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक बाधित असून ७६ लाखांहून अधिकजणांना संसर्ग झाला आहे.