देश ज्यूडीशरीकडून मोदीशरीकडे चालला आहे — अधीर रंजन चौधरी

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । २८ वर्षे चाललेल्या बाबरी मशीद खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी टीकास्त्र सोडले आहे. देश ज्यूडीशरीकडून (स्वंतंत्र न्यायपालिका) मोदीशरीकडे (मोदी प्रभावित न्यायपालिका) चालला असल्याचे वक्तव्य अधीररंजन चौधरी यांनी केले आहे.

वादग्रस्त वक्तव्ये करण्यात प्रसिद्ध असलेल्या अधीररंजन चौधरी यांनी सरकारकडून काही मिळवण्यासाठी न्यायमूर्ती देखील न्याय बाजूला सारू लागल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे सच्च्या लोकांच्या मनात भीतीची भावना निर्माण होईल आणि अपप्रवृत्ती या निकालामुळे आनंदीत होतील असेही चौधरी म्हणाले.

अधीररंजन चौधरी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”जेव्हा न्याय केला जात नाही, तेव्हा सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांच्या मनात भीती बसते आणि जे लोक चुकीचे करतात त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. सरकारला खूष करण्यासाठी निर्णय दिला जातो तेव्हा निर्णय देणाऱ्याला अफाट संपत्ती आणि भेटवस्तू दिली जाते. असे वारंवार होईल असे वाटते. भारत ज्यूडीशरीऐवजी मोदीशरीकडे वाटचाल करत आहे.’

 

दुसरीकडे, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी न्यायालयाचा हा निकाल अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. एक भारतीय मुसलमान या नात्याने आजचा दिवस आपण न्यायालयीन इतिहासातील काळा दिवस असल्याचे मानतो असे म्हटले आहे. आज मी मला एक मुस्लिम म्हणून अपमान, लाज आणि असहाय असल्याचे समजतो, अशा शब्दात ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली हीच भावना १९९२ साली देखील होती, असेही ते म्हणाले.

Protected Content