जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलातील बहुप्रतिक्षित बदल्या करण्यात आला असून याचे गॅजेट प्रसिध्द करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस दलातील बदल्या या अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे यात गतीरोध आला होता. या पार्श्वभूमिवर काही दिवसांपासून बदल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वत: बदल्यांसाठी इच्छुकांना कॉल करून त्यांचे मत जाणून घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके व पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या समितीने बदली अर्जांवर काम केले. या वेळी प्रत्येक कर्मचार्यांनी दिलेल्या ३ पर्यायांपैकी शक्य असेल अशा ठिकाणी बदली देण्यात आली. शासनाच्या नियमानुसार आणि बदली प्रक्रियेमध्ये निकषांच्या आधारावर बदली पात्र पोलिस कर्मचारी विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या पोलिस कर्मचार्यांच्या विनंती, कौटुंबिक अडचणींचा आणि प्रशासनिक बाबींचा विचार करण्यात आला.
या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील ९५६ जणांच्या अर्जांमधून २४४ कर्मचार्यांना बदली देण्यात असून ३७३ कर्मचार्यांना आहे त्याच जागेवर एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तर, उर्वरित कर्मचार्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. बदली झालेल्या कर्मचार्यांमध्ये शिपाई ते सहाय्यक फौजदार या पदांवर कार्यरत असणार्या कर्मचार्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या सर्व कर्मचार्यांनी प्रशासकीय काम पूर्ण करून तत्काळ आपापल्या बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे. या संदर्भात प्रभारी अधिकार्यांनी नियमित अहवाल पाठवावा, असे आदेश पोलिस अधीक्षक डॉ.मुंडे यांनी दिले आहेत.