वॉशिंग्टन वृत्तसंस्था । संपूर्ण जगाचे लक्ष ऑक्सफर्ड- ॲस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या लशीवर लागले आहे. कोरोना लस चाचणीत ही लस आघाडीवर आहे. मात्र, अमेरिकेत या लशीच्या चाचणीवर अद्यापही स्थगिती आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने एका रुग्णाला झालेल्या साइड इफेक्टसची चौकशी करण्यासाठी ही चाचणी थांबवली आहे.
अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाचे सचिव एलेक्स अजार यांनी सांगितले की, अमेरिकेबाहेर या लशीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. मात्र चौकशी अद्यापही सुरू आहे. याआधी ब्रिटनमध्ये पुन्हा परवानगी मिळाल्यानंतर चाचणी सुरू केली आहे. ब्रिटनमधील औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर क्लिनिकल चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
, भारतातही ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या लस चाचणीस परवानगी दिली. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लस चाचणी घेत आहे.
या लशीचे पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर ही व्यक्ती आजारी पडली. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कंपनीने ही लस चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला. भारतातही लस चाचणी थांबवण्यात आली.
ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनका यांनी सांगितले की, काही सूचनांबाबतची माहिती आताच सार्वजनिक करू शकत नाही. मात्र, स्वतंत्ररीत्या झालेल्या चाचणीत ही लस सुरक्षित आढळल्यामुळे लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली. डिसेंबर महिन्यात लशीची पहिली खेप उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जवळपास ७३ देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यामध्ये अमेरिका, भारतासह दक्षिण अमेरिकन देशांचाही समावेश आहे. काही देशांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. थंडीत तापाचेही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बाधितांचीही संख्या वाढण्याचा धोका आहे.