चंदीगड, वृत्तसंस्था । कृषी विषयक विधेयकांवरून शेतकऱ्यांत रोष वाढताना दिसून येतोय. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी कोरोना काळातही आंदोलन करत रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. हरियाणाच्या पानीपतमध्ये दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चक्क अश्रू धुराच्या नळकांड्याही फेकल्या आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला. काही शेतकऱ्यांना ताब्यातही घेण्यात आलंय.
कृषी विषयक विधेयके शेतकऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’ असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येतय. कोणत्याही किंमतीत ही विधेयके लागू होऊ देणार नाही, अशी भूमिकाच या शेतकऱ्यांनी घेतलीय.
आम्हाला जे मिळतंय, त्यात आम्ही समाधानी आहोत. सरकारनं आम्हाला आणखी काहीही देण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना वजा इशाराच या शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी अदानी – अंबानींना विकण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. या विधेयकांमुळे शेतकरी देशोधडीला लागेल, असा आरोपही या शेतकऱ्यांनी केलाय.
दरम्यान, या विधेयकांच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी युनियन आणि अखिल भारतीय शेतकरी संघर्षष समन्वय समितीनं २५ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केलीय.
दुसरीकडे, कृषी विषयक विधेयकांचा विरोध करत राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांचा कामकाजावर बहिष्कार कायम राहिला. कृषी विधेयकाच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचं एक प्रतिनिधिमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. आज सायंकाळी ५.०० वाजता ही भेट होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रतिनिधिमंडळात केवळ पाच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आलीय.