जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास मलकापूर शहरातून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली. ही शहर पोलीसांनी केली असून संशयित आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाघनगर येथील रहिवासी राजू अर्जुन कोळी हे ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहरातील गोलाणी मार्केट येथे दुचाकीने (क्र. एचएच.१९.सीडी. ९७१४) काही कामानिमित्त आले होते. मार्केटसमोरील रस्त्यावर दुचाकी उभी करून ते मार्केटमध्ये निघून गेले. काम आटोपून परतल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही, तिचा आजू बाजूला शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याची त्यांना खात्री झाली. नंतर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुचाकीही मिळाली अन चोरटाही सापडला
गोलाणीतून दुचाकी चोरणारा चोरटा हा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील मालविपूरा भागात असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक अरूण निकम यांना मिळाली होती. तर शक्रुवारी पोलीस निरिक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शिरसाळे व तेजस मराठे यांनी मलकापूर गाठून चोरट्यास सापळा रचून अटक केले. चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बाजिक जकाउल्लाह खान (२५, रा. मालविपूरा, मलकापूर, जि. बुलढाणा) असे सांगितले. विशेष म्हणजे, पोलिसांना चोरी केलेली दुचाकी चोरट्याकडे मिळून आली. शनिवारी शहर पोलिसांनी दुचाकी चोर बाजिक जकाउल्लाह खान यास न्यायालयात हजर केले होते. सुनावणीअंती बाजिक याची जामिनाव सुटका झाली आहे.