वॉशिंग्टन वृत्तसंस्था । चीनच्या पाच नागरिकांनी भारत,अमेरिकेसह १५ देशांतील १०० कंपन्यांवर सायबर हल्ला करून माहिती चोरली असल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे. या चिनी नागरिकांसह दोन मलेशियन नागरिकांविरोधातही आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. या दोघांनी चिनी नागरिकांना हॅकिंग करणे आणि डेटा विकण्यास मदत केली होती.
आरोपी मलेशियन नागरिकांना रविवारी अटक करण्यात आली होती, चिनी नागरिक फरार असल्याची माहिती न्याय विभागाने दिली आहे. अमेरिकेचे महाधिवक्ता जेफ्री रोझेन यांनी चीन सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘संगणक आणि सायबर हल्ल्यांमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करण्यासाठी चिनी नागरिकांनी प्रत्येक साधने वापरली आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने या सायबर हल्ल्यातील आरोपींना सुरक्षित ठेवण्याचाा मार्ग अवलंबला आहे. चीन हॅकर्स इतर देशातून हॅकिंग करतात आणि महत्त्वाची माहिती मिळवून चीन सरकारला मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
वर्ष २०१९ मध्ये हॅकर्सने भारत सरकारच्या संकेतस्थळांना लक्ष्य केले होते. या व्यतिरिक्त, भारत सरकारसाठी काम करणारे काही खासगी नेटवर्क आणि डेटाबेस सर्व्हरवरही हल्ला केला होता. यासाठी भारत सरकारच्या ओपन व्हीपीएनशी जोडण्यासाठी व्हीपीएस प्रोव्हाइडर सर्व्हरचा वापर करण्यात आला. हॅकर्सनी भारतीय संगणकांवर ‘कोबाल्ट स्ट्राइक’ मालवेअर इन्स्टॉल केले होते. अमेरिकेसह जगातील बर्याच देशांमधील १०० हून अधिक कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले.
सुरक्षा संशोधकांनी ‘APT41’, ‘Barium’, ‘Winnti’, ‘Wicked Panda’ and ‘Wicked Spider अशी काही लेबल्स शोधली. ज्यांना या हॅकिंगच्या कामासाठी वापरण्यात आले. यातून हॅकर्सने सोर्स कोड, सॉफ्टवेअर कोड सायनिंग सर्टिफिकेट, कस्टमर अकाउंट डेटा आणि व्यवसायाशी निगडीत माहिती चोरली. त्याच्या मदतीने रॅन्समवेअर आणि क्रिप्टो-जॅकिंगला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अमेरिका, भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनामला लक्ष्य करण्यात आले होते.