मुंबई । झी समूहाने ‘झी वाजवा’ या नावाने नवीन मराठी म्युझिक चॅनल सुरू करण्याची घोषणा केली असून याच्या बोधचिन्हाचे शानदार पध्दतीत लाँचींग करण्यात आले.
दूरचित्रवाणीवरील मराठी वाहिन्यांची संख्या आता वाढू लागल्याचे दिसून येत आहे. यात आता ‘झी वाजवा’ या नवीन वाहिनीची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये झी वाजवाची घोषणा करण्यात आली. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहिनीची सुरूवात या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे.
‘झी वाजवा, क्षण गाजवा’, या कॅचलाईनसह आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे. ”क्षण झिंगाट तर लाईफ झिंगाट!” यानुसार याचे काम चालणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणार्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून मझीफ समूहाचं अभिनंदन केलं.