जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवी गेल्या मार्चपासून हॉटेल व उपहारगृहे पुणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता सर्व हॉटेल व उपहारगृहात फक्त पार्सलद्वारे अन्नपदार्थ देण्याची मुभा देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, हॉटेल्स, उपहारगृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू अनलॉकची घोषणा केल्यानंतर पुर्वपदावर येत असतांना राज्य शासनाने निर्गमित केलेल्या नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स, उपहारगृहे यांना पार्सल द्वारे अन्नपदार्थ विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स, उपहारगृहे सुरू असली तरी त्यातून फक्त पार्सलद्वारे अन्नपदार्थ देण्याची मुभा आहे. त्याठिकाणी थांबून जेवण करण्याची परवानगी दिलेली नाही. प्रशासनामार्फत याची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, हॉटेल्स, उपहारगृहे, चालक व मालक यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईस करण्यात येण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.