नवी दिल्ली । केंद्र सरकारने आज क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून यात क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्यासह चौघांना खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आज सायंकाळी केंद्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली. यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याच्यासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले.
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. या आधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरातील क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंचा सन्मान केला जातो. यंदाच्या क्रीडा पुरस्कार विजेत्यांना याच दिवशी पारितोषीके प्रदान करण्यात येणार आहे.