जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत विना निविदा कामांची मनमानी सुरु असल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. कचरा विल्हेवाटीसाठी हा खर्च म्हणजे हितसंबंधीयांवर उधळपट्टी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
प्रशांत नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वॉटर ग्रेस कम्पनी साठी कचरा ट्रान्स्मिशनसाठी ६० लाख रुपये खर्च झाला आहे. शहरात आयटीआय परिसर, शिवाजीनगर, नेरी नाका व रॅम्प बांधले आहेत. तेथे घंटागाड्यांमधून कचरा कॉम्पॅक्टर मध्ये टाकला जातो. त्यासाठी १८ लाख रुपये खर्च झाला आहे कचरा विल्हेवाटीच्या अन्य कामांसाठी ६० लाख रुपये खर्च झाला आहे. लक्ष्मी कन्ट्रक्शन आणि संदीप टेकाळे यांनी ही कामे केलेली आहेत.
या कामांचा समावेश १४ व्या वित्त आयोगाच्या स्थापत्य कामांच्या डीपीआर मध्ये नसतानाही फक्त मंजुरी देऊन या लेखाशिर्षातून ही कामे केलेली आहेत. अन्य भागातील रॅम्प गैरसोयीच्या ठिकाणी असल्याने नेरीनाका येथील रॅम्पवर कामाचा ताण वाढला आहे. या ठिकाणी घंटागाड्यांची गर्दी होत असल्याने सामान्य वाहतुकीला व्यत्यय येतो ही समस्या वेगळीच आहे. अन्य ठिकाणच्या रॅम्प च्या कामावर झालेला खर्च निरर्थक ठरला आहे. या सावळया गोंधळाचा ठपका नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापालिकेचे अभियंता योगेश बोरोले यांच्यावर ठेवला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी न झाल्यास न्यायालयात दाद मागणीसह उपोषणाचा इशाराही प्रशांत नाईक यांनी दिला आहे.