मुंबई । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या तुफान लोकप्रिय असणार्या दूरचित्रवाणी मालिकेतील अंजली भाभी ही भूमिका साकारणार्या नेहा मेहता यांनी या कार्यक्रम सोडल्याचे वृत्त आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा ही सोनी वाहिनीवरील मालिका आबालवृध्दांच्या आवडीची आहे. अलीकडेच २८ जुलै रोजी या मालिकेस १२ वर्षे पूर्ण झाली. अर्थात, एका तपा नंतरही याची लोकप्रियता अबाधित असल्याचे दिसून येत आहे. यातील बहुतांश पात्रे ही कोट्यवधी जनतेच्या परिचयाची झालेली आहेत. यात जेठालाल पासून ते त्याच्या नोकर असणार्या बाघापर्यंतच्या पात्रांचा समावेश आहे. यातील असेच एक लोकप्रिय पात्र म्हणजे तारक मेहता यांची पत्नी अंजली मेहता होय.
आता तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणारी अंजली भाभी म्हणजे नेहा मेहता यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या एका संकेतस्थळाने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार नेहाने आपला निर्णय निर्मात्यांना सांगितला आहे आणि तीही सेटवर येत नाही. निर्मात्यांनी नेहाची मनधरणी केल्याचा प्रयत्न देखील फोल ठरल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
तारक मेहता मालिकेतील अनेक पात्रांनी आजवर हा शो सोडला आहे. यात टप्पूसह अनेक पात्रांची भूमिका साकारणार्या कलावंतांचा समावेश आहे. यात आता अंजली भाभी म्हणजेच नेहा मेहता यांची भर पडणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. लॉकडाउननंतर तारकचे पुन्हा चित्रीकरण सुरू झाले तरीही नेहा सेटवर हजर झलेली नाही. या वृत्तावर शोच्या मेकर्स आणि नेहाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. परंतु ही बातमी खरी असेल तर चाहत्यांना यापेक्षा मोठा धक्का बसू शकेल.
नेहा सुरुवातीपासूनच या ‘शो’शी संबंधित आहे. तारक मेहताची पत्नी अंजली ही डाएटिशियन आहे आणि तारकसाठी डायट फूड बनवते. यामुळे तारक मेहता नेहमी त्रस्त असतात. दरम्यान, अलीकडेच तारक मेहतामधील अनेक कलावंत ही मालिका सोडत असल्याची माहिती समोर येत आहे. यात आता अंजली भाभी यांनी मालिका सोडल्यास त्यांचे चाहते नाराज होतील हे मात्र निश्चित.