पुणे प्रतिनिधी । पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण होत असतांना सीबीआय त्यांच्या खून प्रकरणाचे वास्तव अद्यापही समोर आणू शकलेली नाही. यात काही जणांना अटक झाली असली तरी यातील प्रमुख सूत्रधार मात्र पडद्याआड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व पूल येथे दि. २० ऑगस्ट २०१३ मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येनंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी संथ गतीने तपास केला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला. या हत्येतील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. विरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना तर २०१९ मध्ये अॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. अमोल काळे, अमित डिगवेकर, राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरूद्ध अद्यापही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. असे असले तरी अद्यापही या हत्येमागील सूत्रधार कोण? हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलीबुर्गी, संपादिका गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांचीही हत्या करण्यात आली. या चारही घटनांचे धागेदोरे एकमेकांत गुंतले असल्याचे विविध तपास यंत्रणांच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळेच या प्रकरणातील आरोपींवर अनलॉफूल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट १९६७ हा कायदा लावण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस यांचे विशेष तपास पथक या तपासासाठी नेमण्यात आले आहे.
तर दुसरीकडे डॉ. दाभोलकर यांनी सुरू केलेले काम आजही जोमाने सुरू आहे. अनेक समविचारी नागरिक हे काम निष्ठेने पुढे नेत आहे. रिंगण नाट्य, मानस मैत्री, जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, जातपंचायतीच्या मनमानीविरोधात आंदोलने, अशा विविध माध्यमातून आम्ही डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा आदर्श समाजासमोर मांडत आहोत, अशा भावना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्यांचा शोध घेण्यात सीबीआय या प्रतिष्ठित तपास यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. मात्र, आजही त्यांचे विचार आणि त्यांना न्याय मिळण्याची आशा जिवंत आहे, अशी भावना मुक्ता आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.