भुसावळ प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या लॉकडाऊनमुळे शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले. ते शहरात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.
शहरातील संतोषी माता हॉलमध्ये मंगळवारी गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन झाले. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी संबोधीत केले. ते म्हणाले की, गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी जास्तीतजास्त चार फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करावी, घरगुती स्थापनेसाठी मुर्तीची उंची दोन फुटांपर्यंत असेल अशी माहिती त्यांनी दिली.
गजानन राठोड पुढे म्हणाले की, गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी १० बाय १० आकारात मंडप टाकावा, आरतीसाठी केवळ पाच जणांची उपस्थिती असावी. प्रत्येक मंडळाने वीज कंपनीकडून रितसर वीज कनेक्शन घ्यावे, मंडळाच्या स्टेजच्या मागे जुगार खेळू नये, भाविकांना दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करावी, मंडळाच्या पदाधिकार्यांची थर्मल ऑक्सीमीटरने तपासणी करावी. सर्वात महत्वाचे म्हणजे गणेश स्थापना आणि विसर्जनाची मिरवणून काढण्यास सक्त बंदी असल्याचा इशारा त्यांनी दिला. विसर्जनासाठी तापी नदीवर कोणालाही जाता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भुसावळ नगरपालिकेतर्फे गणेशमुर्ती संकलन केंद्राची सुविधा शहरातील विविध भागात पुरवली जाणार आहे. भाविकांनी त्यांच्या गणेशमुर्ती या संकलन केंद्रावर जमा कराव्यात असे आवाहन राठोड यांनी केले.