जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ज्या नागरीकांना कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असतील त्यांनी त्वरीत कोरोनाची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांचेवर आवश्यक ते उपचार करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत (7 ऑगस्ट) 13 हजार 574 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्वरीत तपासणी, त्वरीत निदान आणि त्वरीत उपचारामुळे यापैकी 9 हजार 344 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.83 % इतके आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत 592 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात मृत्युचे प्रमाण 4.36% टक्के आहे. मात्र, एकूण मृत्युपैकी 84 टक्के म्हणजेच 499 रुग्ण हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील होते असे निदर्शनास आले आहे. शिवाय एकूण मृत्युपैकी आजारपण असलेले 304 मृत्यु असून याचे प्रमाण 51.35 टक्के इतके आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक वयोगटातील ज्या नागरीकांना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून येत असेल त्यांनी त्वरीत कोरोनाची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांचेवर आवश्यक ते उपचार तातडीने करुन हे रुग्ण बरे होण्यास मदत होईल. असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात उपचार सुरु असलेले 3628 रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या 13 हजार 574 कोरोना बाधित रुग्णांपैकी सध्या फक्त 3638 रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी 246 रुग्ण गृह अलगीकरणात, 2484 रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये, 333 रुग्ण डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर 575 रुग्ण हे डेडिकेटेट कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या 2730 इतकी तर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 908 इतकी आहे. शिवाय जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात सध्या 356 रुग्ण आहेत.
जिल्ह्यात 61 हजार 739 व्यक्तींची कोरोना तपासणी
जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी उपाययोजना राबवित आहेत. यासाठी प्रशासनाने कोरोना सदृश्य लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची स्वॅब घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 61739 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून पैकी 49059 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 13 हजार 574 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शिवाय तपासणीसाठी ॲटिजेंन किटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे अवघ्या दोन तासात अहवाल प्राप्त होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 15217 व्यक्तींची याद्वारे तपासणी करण्यात आली असून पैकी 12425 अहवाल निगेटिव्ह तर 2792 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या उपचाराच्या विविध सोईसुविधांमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील 13574 बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 9344 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.83 टक्क्यांवर पोहोचले आहे.
जिल्ह्यात 922 बेड उपलब्ध
जिल्ह्यात आढळून येत असलेल्या बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार व्हावेत, त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. याकरीता प्रशासनाने जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल सुरु केलेले आहेत. याशिवाय खाजगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी दिली असून अनेक संस्थांना संस्थात्मक विलगीकरण सेंटर सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचाराची कोणतीही अडचण नाही. सद्य:परिस्थितीमध्ये जिल्ह्यात 922 बेड उपलब्ध असून यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 154, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये 475 तर डेडिकेटेट कोविड हॉस्पिटलमध्ये 293 बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांना कोराना घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.