मुंबई प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि. ९ ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे सांगितले.
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाची सुरूवात मंत्रालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. कृषीमंत्री श्री. भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, सचिव एकनाथ डवले आणि शहापूर व वाडा येथील आदिवासी भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, जंगलात आढळणार्या या रानभाज्या, फळं विविध आजारांवर गुणकारी असून त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त ठरू शकतात मात्र शहरी भागातील नागरिकांपर्यंत त्या पोहोचण्यासाठी त्या केवळ प्रदर्शनात न राहता त्यांची विक्री व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत राज्यभर रानभाज्या महोत्सवाची संकल्पना सुचली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून आदिवासी भागातील बाधवांना त्यामुळे रोजगार निर्माण होऊ शकेल.
रानभाज्या महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. या रानभाज्या नागरिकांना कायमस्वरूपी कशा उपलब्ध होतील यांचेही नियोजन करण्यात येत असून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा रानभाज्यांचा औषधी ठेवा शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शहापूर आणि वाडा येथून आलेल्या महिलांनी रानभाज्यांची ओळख सांगितली. त्याचबरोबर त्यांचे औषधी गुणधर्मही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांनी आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना रानभाज्या महोत्सवाविषयी माहिती दिली. यावेळी विविध रानभाज्या एकत्रित असलेली पेटी श्री. पवार यांना भेट देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील कृषीमंत्री श्री. भुसे व राज्यमंत्री डॉ. कदम यांनी रानभाज्यांची पेटी दिली. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सचिव श्री. डवले यांच्या हस्ते रानभाज्यांची पेटी देण्यात आली.