जळगाव प्रतिनिधी । कापुस पिकावर शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सदर किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास येत्या हंगामात पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जामनेर, चोपडा, जळगाव या तालुक्यांमध्ये निदर्शनास आल्याने ही बाब विचारात घेता तातडीने संबंधित सर्व तालुक्यात कापुस पिक क्षेत्राचे सर्व्हेक्षण करुन शेतीशाळा, सभांव्दारे क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत शेतकऱ्यांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
किडीचा ओळख-पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे 11 ते 13 मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो तो नंतर शरीरावर पसरल्याने अळीचे शरीर गुलाबी दिसते. नुकसानीचा प्रकार – सुरुवातीला अळ्या पाते, कळया, फुलांवर उपजिविका करतात, प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट अमलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळयांना “डोमकळया” म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळी बोंडातील बिया खाते त्याचबरोबर अळीने रुई कातरुन नुकसान केल्याने रुईची प्रत खालावते. तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.
एकात्मिक व्यवस्थापन – कपाशीच्या पिकाची तृणधान्य, कडधान्य किंवा गळीतधान्य पिकांबरोबर फेरपालट करा. मृद परिक्षणाच्या आधारावर खताच्या मात्रेचा अवलंब करावा, अळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा, मित्र कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके/मेश्रपिके कपाशी पिकाभोवती घ्यावीत, बोंड अळीग्रस्त डोमकळया व बोंडे वेचून नष्ट कराव्यात. किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्याकरीता हेक्टरी 5 (कामगंध) फेरोमन सापळे लावावेत. किंवा मास ट्रॅपिंगसाठी हेक्टरी 20 फेरोमन सापळे लावावेत व मुदतीत ल्युअर बदलावेत. कपाशीच्या शेतात हेक्टरी 20 ते 25 पक्षी थांबे लावा, कामगंध सापळयात पतंग दिसताच किंवा अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ॲझाडिरेक्टीन 10,000 पीपीएम 10 मिली प्रती 10 लिटर किंवा 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाची 1.5 लक्ष अंडी प्रती हेक्टर या प्रमाणात प्रसारीत करावीत. डिसेंबर/जानेवारी महिन्यात पीक पूर्णपणे काढून टाका त्यापुढे खोडवा/ फरदड घेऊ नका, कपाशी वेचणीचा हंगाम संपताच प-हाटया आणि इतर पालापाचोळा यांचे शेताबाहेर कंम्पोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करा, किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर खाली नमूद किटकनाशकांची फवारणी करावी.
आर्थिक नुकसान पातळी- एक जीवंत अळी प्रती 10 हिरवी बोंडे किंवा प्रती फेरोमन सापळयात आठ ते दहा पतंग सलग 3 दिवस आढळल्यास पुढील पैकी कोणत्याही एक किटकनाशकाची फवारणी करावी. पहिल्या फवारणीसाठी यापैकी एक कीटकनाशक – क्विनॉलफॉस 25 ए एफ प्रति 10लिटर पाणी 20 मि.ली प्रति हेक्टरी कीटकनाशकाचे प्रमाण – 1750- 2500 मि.ली, प्रोफेनोफॉस 50 ईसी – 20 मि.ली. 1500-2000 मि.ली. थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी 20 ग्रॅम. 1000 ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस 20 ईसी 25 मि.ली. 1250-3750 मि.ली. डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के ईसी 10.मि.ली. 500 मि.ली.
दुसऱ्या फवारणीसाठी यापैकी एक- क्लोरेंट्रॅनीलीप्रोल 9.3 टक्के + 5.मि.ली. 250 मि.ली, लँब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के झेडसी, डेल्टामेथ्रीन 1 टक्के + 10 ते 12 मि.ली. 1000-1250 मि.ली ट्रायझोफॉस 35 टक्के ईसी. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी यांचेशी अथवा टोल फ्री क्रमांक-1800 233 4000, वेबसाईट – www.krishi.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा. असे आवाहन कृषि उपसंचालक व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.