महिलेचे बंद घर फोडून ८१ हजारांचा ऐवज लांबविला

रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील समता नगर परिसरात राजू किराणा दुकाना समोरील बंद घर फोडून घरातील चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून दिल्याची घटना शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडला आहे. या संदर्भात सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिभा चंद्रकांत बनसोडे वय-४० रा.राजू किराणा दुकानासमोर, समता नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ६ जानेवारी रोजी कामाच्या निमित्ताने त्यांनी घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान घर बंद असल्याचे फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले ७१ हजारांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पाटल्या असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी अडीच वाजता प्रतिभा बनसोडे ह्या घरी आल्या. त्यावेळी त्यांना घरात सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहे.

Protected Content