मुंबई प्रतिनिधी । दूध उत्पादकांना भाजप सरकारमुळे अडचणी आल्या असल्याने दूध उत्पादक शेतकर्यांच्या नावावर आंदोलन करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नसल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर बाळासाहेब थोरात म्हणाले की, गेल्या पाच वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांना वार्यावर सोडले होते. कोरोनाचे गंभीर संकट असताना शहरांमध्ये दुधाची मागणी पूर्णपणे मंदावली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अशावेळी राज्य सरकारने शेतकर्यांचे दूध स्वत: खरेदी करून ते भुकटीच्या रूपात साठवण्याचा निर्णय घेऊन अंमलात आणला आहे.
राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी उपलब्ध असताना मोदी सरकारने १० हजार मेट्रिक टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला, जो शेतकर्यांच्या मूळावर उठणारा आहे. दूधाचे भाव यामुळे ८ ते ९ रुपये प्रति लिटर पडतील. एके ठिकाणी दूध पावडर आयात करायची आणि दुसरीकडे दूध पावडरसाठी अनुदान मागायचे हा दुटप्पीपणा भाजपाच करू शकते, असा टोला देखील बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.