धरणगाव प्रतिनिधी । खाजगी फायनान्स व इतर पतसंस्था, बँक व संबंधित व्यवसायिकांनी कर्जदाराकडून जबरदस्ती वसुली केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला आहे. याबाबत नायब तहसीलदार वाडीलकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. लाखो, हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहे. संपुर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले आहे. मजूरी बंद झाले आहेत. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने जनतेला सर्वांपरी मदत करीत आहेत. अनेक व्यक्ती परप्रांतात अडकलेले आहेत. घरातील कर्ता पुरुष घरी असल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह होणे सुद्धा अशक्य झाले आहे. अश्यात केंद्र व राज्याने जनतेवरील वसुली सक्तीने न करता प्रेमाने करावी. बळजबरी करू नये असे आदेश असतांना बँक, पतसंस्था, तहसील कार्यालये, तलाठी, सर्कल खाजगी, बजाज फायनान्स, बचतगट वाले हे जनतेच्या घरी जाऊन दादागिरी करून वसुली करीत आहेत. कर्मचाऱ्यांवर दबाव आणून, दडपण आणून कार्य करीत आहे. ह्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात संबंधितांवर कार्यवाही व्हावी, संबधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना मुदतीच्या आत वसुली न आल्यास तुम्हास सेवेतून कमी केले जाईल आश्या धमक्या देत आहे.
हा प्रकार कोठेतरी थांबवावा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल व होणाऱ्या परिणामास खासगी फायनान्स जबाबदार राहतील असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतांना शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, नगरसेवक अहमद पठाण, जितेंद्र धनगर, नंदू पाटील, अजय चव्हाण, विलास पवार, रवींद्र कंखरे, सुरेश महाजन, राहुल रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.