भुसावळ, प्रतिनिधी । राज्य शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ केल्याने शासनाचे प्रतिनिधी म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार संघटनेतर्फे करण्यात आला.
जिवाची पर्वा न करता कोरोनाचे काम करणाऱ्या राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्यात.यासाठी दि.३ जुलै पासून आशा व गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत असहकार आंदोलन करतील. अशी नोटीस शासनाला संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली होती. सदर आंदोलनाची दखल घेत शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात अनुक्रमे दोन हजार व तीन हजार रूपये वाढ करण्याचा निर्णय दि.२५ जुन रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे संघटनेचे स्वागत केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील राहत्या घरी जाऊन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सत्कार केला. शिष्टमंडळात कल्पना भोई, मनिषा वाघ, योगिता पाटील, मिरा बोढरे, ताराबाई पवार, गणेश पाटील यांनी सहभाग घेतला.