Home Cities जामनेर पोलिसांनी सोडविला बांधाचा वाद !

पोलिसांनी सोडविला बांधाचा वाद !

0
28

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असणार्‍या लिहा तांडा येथील शेतीच्या बांधाचा वाद पोलीसात पोहचल्यानंतर पोलीस पथकाने थेट बांधावर जाऊन मोजणी करून देत हा वाद सामोपचाराने मिटविला.

याबाबत वृत्त असे की, येथून जवळच असलेल्या लिहा तांडा येथील शेत बांधाचा वाद शेंदूर्णी पोलिसांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन गावातील मध्यस्थ यांच्या सहकार्याने मिटवला आहे. लिहा शेत शिवारात हरीलाल राठोड यांच्या मालकीचे गट नं ६८/अ/२ असून याच शिवारात त्यांच्या शेत बांधालगत त्यांचे चुलतभाऊ धर्मा गुरुदास राठोड यांचे शेत गट नं ७६ आहे दोघांचा सामाईक बांधाचा गेल्या १० /१५ वर्षांपूर्वीचा प्रलंबित वाद होता त्यामुळे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने शेतात दोन्ही वादींचे वाद व्हायचे व प्रकरण पहुर पोलिस स्टेशनच्या शेंदूर्णी दुरक्षेत्रावर यायचे. परंतु आता हा वाद कायमस्वरूपी मिटला आहे.

लिहा येथील उत्तम मांगो चव्हाण, लखन झामसिंग नाईक, सरीचंद लाला राठोड, जोतमल जयराम चव्हाण,गोकुळ मदन राठोड यांनी मध्यस्थाची भूमिका पार पडल्यामुळे त्यांच्या माध्यमातून शेंदूर्णी पोलिसांनी शेतात प्रत्यक्ष पाहणी करून शेत बांधाच्या एका टोकावरून दुसर्‍या टोकापर्यंत दोरी टाकून सर्वांच्या सहमतीने बांध आखणी केली. दगडाच्या ठिकठिकाणी खुणा रोवून बांध वाद मिटवला. दोन चुलत भावांच्या मधील १०/१५ वर्षांपूर्वीचा बांधाचा वाद सामोपचाराने कायमस्वरूपी मिटवला त्याबद्दल पो.ना.८७० किरण शिंपी,पो.ना.२०९६ प्रशांत विरणारे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound