जळगाव प्रतिनिधी । सिव्हीलमधील दुर्घटना आणि कोरोनाच्या प्रतिकारातील भोंगळपणाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अभिजीत राऊत हे आज नवीन जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे सांभाळणार आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडाला असून याचा प्रतिकार करण्यात प्रशासन साफ अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. यातच सिव्हील हॉस्पीटलमधील शौचालयात एका महिलेचा मृतदेह तब्बल आठ दिवस पडून असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे जनमानस संतप्त झाले आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्यासह पाच अधिकारी व तीन कर्मचार्यांना निलंबीत करण्यात आले आहे. तर याच प्रकरणात सदोष मनुष्यबधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे जिल्हा रूग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई झाली असतांना जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी देखील आपली जबाबदारी समर्थपणे पाडली नसल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर लवकरच जिल्हाधिकार्यांची बदली करण्यात येणार असल्याचे संकेत अजितदादा पवार यांनी दिले होते. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर अभिजीत राऊत हे जळगावच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे सांभाळणार आहेत.
डॉ. अविनाश ढाकणे यांनी ११ फेबु्रवारी २०१९ रोजी जळगावच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली होती. साधारणपणे प्रशासकीय अधिकारी हा एका ठिकाणी तीन वर्षे पूर्ण करतो. तथापि, कोरोनाच्या आपत्तीला सक्षमपणा हाताळू न शकल्याने त्यांची या आधीच बदली करण्यात आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, नवीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे मूळचे अकोला येथील रहिवासी असून ते २०१३ च्या भारतीय प्रशासनीक सेवेचे (आयएएस) अधिकारी असून ते सध्या सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.