भुसावळ (संतोष शेलोडे)। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अगदी गजबजलेल्या गांधी चौकातील मनिष मॉलमध्ये जास्त कामगार व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याचा ठपका ठेवत भुसावळ नगरपालिका प्रशासनाने आज दुपारी मॉलला सील ठोकले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोना बाधितांचा आकडा ११०० टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊनचा हा पाचवा टप्पा असून यात काही शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील मेन रोडवरील गांधी चौकातील मनिष मॉल दुकानात जास्त कामगार व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याची माहिती भुसावळ नगरपालिका प्रशासनाला मिळाली त्यानुसार दुकानाचे शॉप ॲक्ट परवाना तपासणीत केली असता त्यात एक मालक आणि ९ कामगार इतकी संख्या नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात तपासणीत मालकासह २१ जण आढळून आलेत व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने दुकान कुलूप लावून सील ठोकण्यात आले आहे. यावेळी ही कारवाई पालिकेचे प्रभारी नगर अभियंता पंकज पन्हाळे यांनी कारवाई केली आहे. यावेळी पंच म्हणून पोलीस कॉन्स्टेबल दिपक शिंदे आणि अनिल पाटील यांनी काम पाहिले.